Monday, May 15, 2023

माझ्या आठवणी

 

NDA खडकवासला


1969 ते 1971 पर्यंत मी NDA खडकवासला मध्ये होतो. त्या वेळच्या काही आठवणी.

त्यावेळी, NDA ला जायला, खूपच कमी, फक्त ST च्या गाड्या जायच्या, आठवणी प्रमाणे स्वारगेट हून कर्वे रस्ता मार्गे.

आम्हाला कधी कधी रविवारी घरी यायची परवानगी मिळायची, दिवस भर राहून परत जाताना, गरवारे कॉलेज च्या ही आधी, कर्वे रस्त्याला शेवटची बस पकडायचो. कर्वे रस्त्याला तेव्हा फार वस्ती नव्हती, बस सुरू झाल्यावर, सगळीकडं अंधार असायचा आणि आणखीन पुढं गेलं की अजिबातच वस्ती नव्हती. एकदम NDA च्या जवळ गेलो की प्रकाशाचा झगमगाट दिसायचा. आता अगदी NDA पर्यंत वस्ती आहे, PMPML ची नियमित सेवा ही आहे. चांदणी चौकात वाहनांची संख्या आणि वर्दळ प्रमाणाबाहेर जास्त आहे, त्यावेळी अगदी कल्पनेच्याही पलीकडे.

NDA मध्ये घोडेस्वारी ही शिकलो, मजा यायची. कधी कधी, cross country म्हणून NDA बाहेर ही आम्हाला घेऊन जात होते, अशावेळी शिवणे, उत्तमनगर वगैरे त्यावेळची गाव आठवतात. तिथं आमचं छान स्वागत व्हायचं, उसाचा रस, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे असे season प्रमाणे जे असेल ते खायला प्यायला देत होते, कधीही पैसे न घेता. आता, ही त्यावेळची गावं पुण्यात समाविष्ट करण्यात आली आहेत, शेत जमीन बहुतेक ठिकाणी घर बांधण्यात गेली, तसला पाहुणचार ही संपला असेल आणि cross country ची जागा ही.

पुणे आता इतकं अफाट पसरलंय की NDA ला जाण्यात किंवा तिथून शहरात येण्यात त्या वेळच्या सारख नावीन्य किंवा रोमांच राहिला नाही


पुणे शहर आणि पुणे कॅम्पचे ते दिवस 


आम्ही  वानवडी भागात ( जुन Command Hospital) रहायचो, १९६८ ते १९६९ साली. तेव्हा त्या भागात रहदारी खूपच कमी होती, दिवसाही क्वचितच वाहन दिसायची, संध्याकाळी ती ही दिसायची नाहीत, पण एवढंच काय, रस्त्यावर माणसं सुद्धा खूप कमी असायची, सगळं कसं शांत शांत असायचं.

तेव्हा पोलिसांची भीती वाटायची, सायकलला जर (केरोसीनचा) दिवा नसला की पोलीस पकडायचे आणि दंड भरावा लागायचा

पुढं पुणे कॅम्प च्या पलीकडे ही सगळ्या बाजुंना पसरत गेलं, सगळी वाहन वाटेल तो रस्ता पकडत त्यातून जायला लागलीआणि कॅम्प चा जो एक वेगळा ठसा होता तो मिटत गेला